- पांधन रस्ते
- ग्रामीण मार्ग
- इतर जिल्हा मार्ग
- प्रमुख जिल्हा मार्ग
- प्रमुख राज्य मार्ग
- राष्ट्रीय महामार्ग
सन 1961 ला राज्यात प्रथम रस्ते विकास योजना मंजूर करण्यात आली. दर 20 वर्षांनी सुधारीत रस्ते विकास योजना मंजूर करण्यात येते. त्यानुसार 1961-81, 1981-2001 व 2001-2021 या प्रमाणे रस्ते विकास योजनांना मंजूरी देण्यात आलेली आहे. शासन निर्णय 24 एप्रील 2012 अन्वये 1 मे 2012 पासुन 2001-2021 या तीसरा रस्ते विकास योजनेची अंमलबजावनी करण्यात आलेली आहे.
वरील प्रमाणे रस्त्यांचे बांधकाम करतांना शासन मानकानुसार प्रथमत: सरकारी पांधनीचा उपयोग केला जातो. परंतु रस्ता बांधकामासाठी ज्या ठिकाणी शासकीय पांधन उपलब्ध न झाल्यास खाजगी जमीनीची भुसंपादन करून रस्त्याचे बांधकाम केल्या जाते. रस्त्याचा प्रकार व दर्जा ठरवितांना खालील प्रमाणे निकष मुख्यत: निर्धारित करण्यात येते.
- पांधन रस्ता :- पांधन रस्त्यांचा उपयोग मुख्यत: शेतात जाणे-येणे साठी केल्या जातो.
- ग्रामीण मार्ग :- 2 गांवांना जोडणारा रस्ता तसेच मुख्य मार्गापासुन गावांना जोडणारा रस्ता म्हणजे ग्रामीण मार्ग होय. महसुल खात्याअंतर्गत अस्तीत्वातील शासकीय पांधन रस्त्याला रस्ते विकास आराखडयामध्ये समाविष्ट केल्यावर पांधन रस्त्याचे रूपांतर ग्रामीण मार्ग दर्जाच्या रस्त्यात होते. ग्रामीण मार्गाच्या रस्त्याचा डांबरीपृष्ठभाग हा 3.00 मीटर रूंदीचा असतो. या रस्त्याची भार वहन क्षमता कमी असते.
- इतर जिल्हा मार्ग :- 2 पेक्षा जास्त गावांना जोडणारा तालुका अंतर्गतचा रस्ता म्हणजे इतर जिल्हा मार्ग होय. ग्रामीण मार्ग दर्जाच्या रस्त्यावरील वाहतुक वर्दळ वाढल्यावर 2 पेक्षा जास्त गावांना जोडणारा ग्रामीण मार्ग दर्जाचा रस्ता इतर जिल्हा मार्ग म्हणुन दर्जाेन्नत करण्यात येतो. इतर जिल्हा मार्गाच्या रस्त्याचा डांबरी पृष्ठभाग हा 3.75 मीटर रूंदिचा असतो.
- प्रमुख जिल्हा मार्ग :- 2 पेक्षा जास्त तालुक्यांना जोडणारा मुख्य रस्ता म्हणजे प्रमुख जिल्हा मार्ग होय. इतर जिल्हा मार्ग दर्जाच्या रस्त्यावरील वाहतुक वर्दळ वाढल्यावर 2 पेक्षा जास्त तालुक्यातील व मोठया लोकसंख्येच्या गांवांना जोडणारे रस्ते प्रमुख जिल्हा मार्ग म्हणुन दर्जाेन्नत करण्यात येतात. या रस्त्याचा डांबरी पृष्ठभाग 3.75 मी. रूंदीचा असतो. सदर प्रकारच्या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असतात.
- राज्य मार्ग :- 2 पेक्षा जास्त जिल्हयांना जोडणारे मुख्य रस्ते म्हणजे राज्य मार्ग होय. प्रमुख जिल्हा मार्ग दर्जाच्या रस्त्यावरील वाहतुक वर्दळ वाढल्यावर 2 पेक्षा जास्त जिल्हयातील व मोठया लोकसंख्येच्या गांवांना जोडणारे रस्ते राज्य मार्ग म्हणुन दर्जाेन्नत करण्यात येते. या रस्त्याचा डांबरी पृष्ठभाग 5.50 मी. रूंदीचा असतो.
- प्रमुख राज्य मार्ग :- राज्यातील प्रमुख जिल्हयांना जोडणारे मुख्य रस्ते म्हणजे प्रमुख राज्य मार्ग होय.
- राष्ट्रीय महामार्ग :- 2 पेक्षा जास्त राज्यांना जोडणारे मुख्य रस्ते म्हणजे राष्ट्रीय महामार्ग होय.